७ एप्रिल हा ‘जागतिक आरोग्य दिन’ आहे. या वर्षीचे घोषवाक्य आहे. “नैराश्य-चला बोलू या!”(Depression- Let’s talk) आजच्या ‘मन की बात’ या दरमहा प्रसारीत होणा-या आकाशवाणीवरील कार्यक्रमात पंतप्रधान मा. नरेन्द्र मोदींनी देखील या संदर्भात भाष्य केले. त्याचे औचित्य साधून सह्याद्री वाहिनीवर वाशी येथील ‘सौमनस्य’ या मानसोपचार केन्द्राचे डॉ. चेतन विसपुते यांची मुलाखत साडेनऊच्या बातमीपत्रात प्रक्षेपित करण्यात आली. ‘नैराश्य- कारणे आणि उपाय” या विषयाचा थोडक्यात पण आशयघन मागोवा त्यांनी घेतला. जागतिक निराश देशांच्या यादीत भारताचा क्रमांक जरी १२२वा असला तरी तो या आधी ११८ होता असं त्यांनी सांगितलं.भारताच्या पंतप्रधानाना या विषयावर भाष्य करावं लागतं यारूनच या विषयाचं गांभीर्य लक्षात येतं. भारतातील सुमारे ३५ कोटी लोक या विकाराने त्रस्त आहेत.याचा अर्थ प्रत्येक ३ माणसामागे १ माणूस मनोविकारीत आहे. मनोविकाराचे तीव्र,मध्यम व सौम्य असे तीन प्रकार असतात. तीव्र मनोविकार असणारांचे प्रमाण १ ते २ टक्के आहे.रोजच्या जीवनात आपण ‘मला खूप टेन्शन आहे’ असं सहज म्हणतो तो सौम्य प्रकार असतो. काम करण्याची इच्छा न होणे,भूक व झोप न लागणे अशी लक्षणे त्यात असतात. निराश वाटणे,आत्महत्त्येचे विचार मनात येणे अशी त्या विकाराची तीव्रता सौम्य, मध्यम,व तीव्र या वाढत्या श्रेणीने वाढत जाते. नैराश्य विकाराच्या कारणांचा पण डॉ. विसपुते यांनी ऊहापोह केला. १)जैविक – या प्रकारात तणावामुळे मेंदूतील रासायनिक बदल तसेच ग्रंथी वा थायरॉईडचे आजार हे ही एक कारण असू शकते. २) सामाजिक- गरीबी, बेकारी, व्यसनाधिनता आदि कारणाने मानसिक ताणतणाव वाढतात.३) मानसिक ताण- १०वी च्या परीक्षेचा मानसिक ताण घेऊन १० लाख मुलांपैकी ३ मुले आत्महत्त्येच्या थरापर्यंत पोहचतात. व्यक्तिमत्व दोषामुळे असे घडते. भारतातील या विकाराबाबत बोलताना त्यांनी गरीबी, आरोग्यसेवांचा अभाव, बेकारी, मूलभूत सोयींचा अभाव व लोकसंख्या वाढ अशी कारणे या विकारामागे असल्याचे नमूद केले. ही अतिशय गंभीर बाब असल्यानेच मोदींसारख्या पंतप्रधानांनी या समस्येची दखल घेतली. ‘देश परिवर्तन’ वा ‘अच्छे दिन’ अशा विकास कार्यक्रमाला अशा विकारांनी खीळ बसू शकते. यावरच्या उपचारासंदर्भात सुद्धा त्यांनी सूत्रसंचालकाच्या प्रश्नाला उत्तर देताना भाष्य केले. तीव्र व मध्यम स्वरूपाच्या मानसिक नैराश्यावर दीर्घकालिन औषध हाच इलाज असून तो निश्चितपणे आटोक्यात येऊ शकतो. सौम्य विकारांवर समुपदेशनाच्या १० ते १५ बैठका घेतल्या तर फरक पडतो. दीपीका पदुकोण ही अभिनेत्री नैराश्याने त्रस्त होती पण ६ ते ९ महिन्यांच्या उपचारानंतर ती आता त्यातून बाहेर पडली आहे. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे अध्यक्ष देखील या विकाराने त्रस्त होते. थोडक्यात म्हणजे तणाव हा सर्वांनाच असतो. किंबहूना तणावामुळेच आयुष्य सुंदर बनते. यावरचे साधे सोपे इलाज आपण नियमित केले तर Frustration tolerance नक्कीच वाढतो. नियमित व्यायाम, साधा सात्विक आहार, योगासने, व व्यसनांपासून कटाक्षाने लांब राहणे ही चतुःसुत्री नैराश्याला नक्कीच दूर ठेवते हे त्यांनी आवर्जून नमूद केले. सर्व समाजघटकांशी प्रत्यक्ष संवाद आवश्यक असण्यावर त्यांनी भर दिला. ‘मन की बात’ च्या पार्श्वभूमीवर सह्याद्री वाहिनीने ही मुलाखत प्रसारीत केली. Let’s Talk या घोषवाक्यानेच डॉ. विसपुते यांनी मुलाखतीचा समारोप केला.